मजूरीवरून सुरू झालेला वाद हिंसक वळणावर; दोघा भावांकडून शेजाऱ्याला अमानुष मारहाण, बिअरची बाटली डोक्यात फोडली .

 

               पुरंदर रिपोर्टर Live 

पुणे : प्रतिनिधी 

ट्रक खाली करण्यासाठी बोलावून दिलेल्या मजुरीवरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. कोरेगाव पार्कमधील संत गाडगे महाराज वसाहतीत दोन भावांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात बिअरची बाटली फोडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रकाश शेजवळ (वय ३५, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी संपकाळ आणि सोन्या संपकाळ (दोघेही रा. संत गाडगे महाराज वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (७ जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश शेजवळ हे एका खासगी कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करतात. रविवारी ते साई मंदिराशेजारी थांबले असताना सनी आणि सोन्या संपकाळ यांनी त्यांच्याजवळ येऊन “कोरेगाव पार्कमधील पेट्रोल पंपाजवळ ट्रक खाली करायचा आहे, तुला जे वाटेल ती मजुरी देऊ,” असे सांगितले. शेजवळ यांनी काम करून घेतले, मात्र काम झाल्यानंतर केवळ ३०० रुपये मजुरी देण्यात आली.


या रकमेवरून शंका उपस्थित करताच वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. दोघा भावांनी लाथाबुक्क्यांनी शेजवळ यांना मारहाण केली आणि नंतर बाजूला पडलेली बिअरची बाटली त्यांच्या डोक्यात फोडून जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बडे करत आहेत.


Post a Comment

0 Comments